आजपासून दहावीची परीक्षा, परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा असणार कडेकोट बंदोबस्त
सोलापूर : फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होत असलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) आज शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर ६५ हजार ५८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
दरम्यान, मराठी म्हणजेच भाषा विषयाच्या पेपरने दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. राज्याचे मुख्य सचिवांनी कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व त्या आवश्यक यंत्रणेचा वापर करावा, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात १५ परिरक्षक केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत पार पडणार आहे.
परीक्षा केंद्रावर विशेष पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार असून, बैठे पथकेही नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला असून, संवेदनशीलकेंद्रावर शिक्षण विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले.
शहर व जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर आज परीक्षेला येणाऱ्या मुलांचे आनंदी वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. औक्षण करून गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत करण्याचे नियोजन केंद्रसंचालकांनी केले आहे. यासाठी शाळा, महाविद्यालय परिश्रम घेत आहेत.